या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय मुक्त प्रवेश सप्ताहाची (१९–२५ ऑक्टोबर) संकल्पना आहे - “ज्ञानाची किंमत”.

मानवी आकलन वृद्धिंगत करण्यासाठी आणि सार्वजनिक हित साधण्यासाठी आपण ज्ञानाची निर्मिती करतो व ते सामायिक करतो. ज्ञान मिळवणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणे हा मूलभूत मानवी हक्क आहे, ही आपली ठाम भूमिका आहे. तथापि, ज्ञानाच्या प्रवेशाचा आणि प्रसाराचा खर्च सतत वाढत असून अनेकदा तो अत्यंत उच्च पातळीवर पोहोचतो. यामागील कारणे कोणती? आणि या वाढत्या खर्चाचा खरा फायदा कोणाला होतो?

ज्ञानाच्या सर्व स्तरांवर वाढत चाललेले एकत्रीकरण आणि व्यावसायिक नियंत्रण यांची मोठी किंमत समाजाला मोजावी लागत आहे. यावर्षीची ही संकल्पना आपल्याला ज्ञानाची निर्मिती, प्रसार आणि जतन यांतील आर्थिक, मानवी आणि पर्यावरणीय खर्चांचा सखोल विचार करण्यास प्रवृत्त करते—विशेषतः जेव्हा हे खर्च सार्वजनिक हिताऐवजी खाजगी फायद्यामुळे आकार घेतात. गेल्या वर्षीची “आपल्या ज्ञानाचा मालक कोण?” ही संकल्पना ज्ञानाच्या व्यावसायिक मालकीवर प्रकाश टाकत होती; यावर्षी आपण त्या वास्तवाच्या किंमतीचा आणि ज्ञान प्रणालींवर सार्वजनिक हितासाठी पुन्हा नियंत्रण मिळवण्याच्या मार्गांचा विचार करणार आहोत.

हे खर्च केवळ नियतकालिकांच्या वर्गणी किंवा लेख प्रक्रिया शुल्क (APC) यांच्या वाढत्या दरांपुरते मर्यादित नाहीत. लेखक, समीक्षक आणि संपादक यांच्या वेळेचा व श्रमाचा खरा मोबदला काय आहे? या विनामूल्य श्रमाचा लाभ कोणाला होतो? जागतिक लोकसंख्येतील मोठा घटक अजूनही ज्ञाननिर्मिती आणि प्रसार प्रक्रियेत न्याय्य सहभागापासून वंचित आहे—याची किंमत काय? स्थानिक डेटा सार्वभौमत्वाचा आदर न होण्याचे परिणाम काय आहेत? संशोधकांची कामे त्यांच्या संमतीशिवाय किंवा योग्य मोबदल्याशिवाय मालकी हक्क असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालींसाठी वापरली जात आहेत—हे कितपत योग्य आहे? तसेच, ज्ञानवाटपाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे वाढणारी वापरकर्ता निगराणी (surveillance) ही आणखी एक गंभीर चिंता आहे. लोकांच्या मूलभूत गरजांपेक्षा डेटा सेंटर्सना प्राधान्य दिले जात असल्यास त्याची सामाजिक आणि पर्यावरणीय किंमत काय?

सध्याची व्यवस्था न्याय्य नाही—ती कधीच नव्हती. आणि ती कायम ठेवणे हे तटस्थही नाही. ज्ञानवाटपाच्या प्रणालींमध्ये समाजाच्या सर्व घटकांच्या हिताचे प्रतिबिंब दिसण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर बदल घडवून आणणे अत्यावश्यक आहे.

सुदैवाने, ज्ञानाला सार्वजनिक संपत्ती म्हणून निर्माण, जतन आणि प्रसारित करण्याची अनेक सकारात्मक उदाहरणे उपलब्ध आहेत. स्थानिक डेटा गव्हर्नन्स मॉडेल्सपासून ते विनामूल्य, गैर-व्यावसायिक आणि समुदाय-चालित प्रकाशन पद्धतींपर्यंत विविध शाश्वत पर्याय विकसित होत आहेत. UNESCO च्या ‘ओपन सायन्स’ शिफारशीला १९३ देशांनी मान्यता देऊन या दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आता हीच वेळ आहे की, मुक्त प्रवेश सप्ताह केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित व्हावा.

ओपन ॲक्सेस सप्ताह २०२६ हा १९ ते २५ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाईल. तथापि, वर्षभरात सोयीस्कर वेळी चर्चांचे आयोजन आणि कृती करण्यास सर्वांना प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक समुदाय आपल्या स्थानिक संदर्भानुसार ही संकल्पना स्वीकारू शकतो आणि त्यानुसार संवाद साधू शकतो. यासाठी सानुकूलित ग्राफिक्स टेम्पलेट्सही उपलब्ध आहेत.

या घोषणेची विविध भाषांमधील भाषांतरे, संकल्पनेशी संबंधित ग्राफिक्स आणि अधिक माहिती openaccessweek.org वर उपलब्ध आहे. सप्ताहाचा अधिकृत हॅशटॅग आहे #OAWeek.

स्पार्क (SPARC) बद्दल

SPARC ही एक ना-नफा संस्था आहे जी संशोधन आणि शिक्षणासाठी मुक्त व समावेशक प्रणालींना प्रोत्साहन देते. तिचे ध्येय म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञानात प्रवेश, सहभाग आणि लाभ मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणे. आंतरराष्ट्रीय मुक्त प्रवेश सप्ताहाची सुरुवात २००८ मध्ये SPARC आणि विद्यार्थी समुदायातील भागीदारांनी केली.

आंतरराष्ट्रीय मुक्त प्रवेश सप्ताहाबद्दल

मुक्त प्रवेश सप्ताह हा ज्ञानाच्या मुक्त देवाणघेवाणीला जागतिक स्तरावर गती देण्याचा एक प्रभावी मंच आहे. तो धोरणात्मक बदलांना चालना देतो आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतो. हा कार्यक्रम जगभरातील संस्था, संशोधक आणि समुदाय यांच्या सहभागातून साजरा केला जातो. सप्ताहाचा अधिकृत हॅशटॅग आहे #OAWeek.

Previous
Previous

Latvian

Next
Next

Romanian